"पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय चर्चांना उधाण; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांची भेट."
महाप्रहार धमाका: पिंपरीत पवारांची 'पॉवर' गेम! आझम पानसरेंच्या भेटीने राजकीय भूकंप; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?
📍पिंपरी-चिंचवड:
राज्याच्या राजकारणात सध्या फोडाफोडी आणि बेरजेच्या राजकारणाला उधाण आले असतानाच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या भेटीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की एखादा मोठा 'गेम' होणार, या चर्चेला धार चढली आहे.
नेमकं काय घडलं?
१. अजित पवारांची एन्ट्री: अजित पवार यांनी थेट आझम पानसरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. पानसरे हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि पिंपरी-चिंचवडमधील दिग्गज नेते मानले जातात.
२. निहाल पानसरेंचा प्रवेश: विशेष म्हणजे, कालच आझम पानसरे यांचे चिरंजीव निहाल पानसरे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश केला होता.
३. शर्टचेक की मास्टरस्ट्रोक?: मुलाच्या प्रवेशानंतर आता खुद्द आझम पानसरे यांनाही आपल्या गटात खेचण्यासाठी अजितदादांनी हे आमंत्रण दिले असल्याची चर्चा रंगली आहे.
पवार गटाची हालचाल आणि गुप्त बैठक
एकीकडे अजित पवार सक्रिय असतानाच, शरद पवार गटानेही आपले किल्ले लढवण्यास सुरुवात केली आहे. कालच खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार यांनी पानसरे यांच्या घरी जाऊन बैठक घेतली होती. तसेच, भाचा झिशानच्या कार्यालयात दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक झाल्याचेही समोर आले आहे.
रोखठोक प्रश्न: 'ती' चर्चा कशासाठी?
अजित पवार आज केवळ मुलाच्या प्रवेशानंतर सदिच्छा भेट द्यायला आले होते की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्याच्या अनुषंगाने कोणती छुपी चर्चा करण्यासाठी आले होते, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या भेटीचे गूढ स्वतः अजित पवारच उलगडू शकतात, मात्र या एका भेटीने पिंपरीतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे आहेत.
'महाप्रहार'चा सडेतोड अंदाज:
पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवारांची ताकद मानले जाणारे पानसरे कुटुंब जर अजित पवारांच्या गळाला लागले, तर हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का असेल. मुलाला पक्षात घेतल्यानंतर बापालाही साद घालणारे अजितदादा आगामी काळात कोणता मोठा निर्णय घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.